मनःपूर्वक कृतज्ञता – तुमची मदत अनेकांना जीवन रक्षक आणि हजारोंना दिलासादायक ठरली

14 जुलै, 2021

प्रिय दैवी आत्मन,
अलीकडच्या काही आठवड्यांत भारतभर पसरलेल्या, नुकत्याच आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले, जिचा परिणाम देशातल्या जवळजवळ प्रत्येकाच्या कुटुंबाला आणि मित्रमंडळींना सोसावा लागला.

वाय एस एस /एस आर एफ अध्यक्ष संपर्क साधतात

आपले पूजनीय अध्यक्ष श्री श्री स्वामी चिदानंद गिरीजी यांनी ज्या भारतीयांना आणि जगभरातील लोकांना अकल्पनीय आव्हानांना तोंड द्यावे लागले त्यांच्यासाठी सांत्वना, आधार आणि प्रोत्साहन देणारा हृद्यस्पर्शी आणि समयोचित संदेश पाठवला.

वाय एस एस केंद्रे आणि मंडळांचा पुढाकार

कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला स्वामी चिदानंद यांच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनाने आणि संपूर्ण भारतीय उपखंडातील लोकांच्या त्रासांच्या वेदना व गरजा जाणून, वाय एस एस ने त्याच्या आवाक्यात असेल असे सहाय्य संपूर्ण भारतभरातील शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. आम्ही थोड्याच अवधीत ओळखले की हे साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग -आपल्या देशभर पसरलेल्या एकमेकांशी जोडलेल्या वाय एस एस केंद्रांमध्ये व मंडळांमध्ये सेवा कार्य करणाऱ्या आपल्या प्रचंड आध्यात्मिक परिवारातील भक्तांकडे वळणे हाच होऊ शकेल. वाय एस एस केंद्रांच्या व्यवस्थापक समितीशी विडिओ कॉन्फरेन्स घेऊन आम्ही शेकडो स्वयंसेवक भक्तांची यादी तयार करू शकलो जे ह्या उदात्त ध्येय्यासाठी आपला वेळ, शक्ती आणि साधने देऊन सेवा करण्यास तत्पर होते. ह्या भक्तांनी निरनिराळ्या एन जि ओच्या व स्थानीय अधिकाऱ्यांच्या मदतीने वाय एस एसचे मदतकार्य यशस्वीरित्या पार पाडले.

गरजूंना अन्न, रुग्णांना औषधे आणि रुग्णालयांना व एन जी ओना सेफ्टी किट व जीवनरक्षक संसाधने पुरवण्यासाठी अनेक भक्तांनी आपल्या घरांची सुरक्षितता सोडून दिली. हजारो गरजू लोकांपर्यंत सहाय्य व अनेक वेळा आशा घेऊन पोचलेल्या ह्या स्वयंसेवकांनी केलेला असीम वैय्यक्तिक त्याग आपल्याला कदाचित पूर्णपणे कधीही कळू शकणार नाही. भारतात कोविड -19 चे संकट अगदी शिखरावर असताना आम्ही छोट्याशा कालावधीत मदतकार्य अभूतपूर्वरीत्या पूर्णपणे साध्य करू शकलो.

संपूर्ण भरतातील लोकांना वाय एस एसचे सहाय्य मिळाले

उत्तरेतील उत्तुंग हिमगिरीत अडकलेल्या साधूंपासून दूर दक्षिणेत केरळमधील खेडुतांपर्यंत आणि ह्या मधील बहुतेक राज्यांमध्ये वाय एस एस मदत पोचवू शकले. आम्ही अत्याधिक गरजेचे अन्न किंवा कोरडे धान्य हजारो गरजवंतांना पुरवू शकलो. संपूर्ण देशभरातील निरनिराळ्या शहरांमध्ये कार्यरत असलेल्या लहान-मोठ्या कोविड उपचाराच्या सुविधांना अनेक साहित्य पुरवण्यात आले त्यात रुग्णांसाठी बिछाने, व्हील चेअर्स, पी पी ई किट्स, उत्तम दर्जाचे मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि कोविडच्या संसर्गाच्या उपचारासाठी आवश्यक औषधे, पल्स ऑक्सिमीटर्स आणि थर्मोमीटर्स यांचा समावेश आहे.

हिमालयात गंगोत्री येथे अडकलेल्या साधूंना जेऊ घालताना वाय एस एस भक्त

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि बाय पॅप व्हेन्टिलेटर्स यांचा पुरवठा करण्यात आला

केरळ येथील कोविड रुग्णालयात वाय एस एस, बायपॅप मशीन्स देणगी स्वरूपात देताना

काही रुग्णालयांना त्यांच्या विभागांमध्ये कोविडच्या उपचाराचे स्तर उंचावयाचे होते. वाय एस एस त्यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि बाय पॅप व्हेन्टिलेटर्स मशीन्स यांची पुरवणी करू शकले. केरळ मधील एका रुग्णालयात एका विभागात ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वाय एस एस ने ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टिम ची स्थापना करण्यासाठी मदत केली.

रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करू शकणारे बिछाने उपलब्ध नसताना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स किती जीवन रक्षक ठरू शकतात हे लक्षांत आल्यावर वाय एस एस ने आपल्या अधिकांश लहानमोठ्या केंद्र मंडळामध्ये एक  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्याचे ठरवले. 40 पेक्षा अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे वितरण करण्यात आले. ह्या कॉन्सन्ट्रेटर्सच्या देखरेखीसाठी त्यांना कार्यान्वित करण्यासाठी एका कुशल कमिटीने विस्तृत लेखी विडिओ सूचना पुरवल्या आणि त्यांची देखरेख करणाऱ्यांना पुरवणी करणाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

वाय एस एस भक्त त्यांच्या साधनांद्वारे मदत पुरवीत

काही वाय एस एस केंद्रे आम्ही त्यांच्या पर्यंत पोचण्यासाठी थांबली नाहीत. त्यांनी आपण होऊनच पूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या साधनांचा उपयोग करून मदत कार्य सुरु केले. वाय एस एस तिरुपती ध्यानकेंद्राने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्याची सेवा सुरु केली, तर वाय एस एस रायपूर ध्यानकेंद्राने रुग्णांना उपचार स्थळी हलवण्यासाठी ऍम्ब्युलन्स सेवा भाड्याने घेतली. अनेक भक्तांनी आपल्या जीवनाच्या बचतीतून त्यांच्या रुग्ण शेजाऱ्यांना व समाजाला मदतीसाठी खर्च केला.

रायपूर येथील कोविड रुग्णांसाठी भाड्याने घेतलेल्या ऍम्ब्युलन्स सह भक्त

द्वारहाट आणि सभोवतालच्या खेड्यातील कोविड निवारण कार्य

द्वारहाट येथे एका वैद्यकीय कॅम्प मध्ये डॉक्टर भक्त

वाय एस एस कडून द्वारहाटमध्ये व सभोवताली झालेले निवारण कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आमच्या लक्षांत आले की तरूण स्वयंसेवकांचा एक स्थानीय गट खेडुतांचे कोविड साथीपासून निवारण करीत आहे. त्याची मदतीची तत्परता पाहून आणि एका वाय एस एस भक्ताच्या व मुंबईच्या एका डॉक्टरच्या निस्वार्थ सेवेमुळे द्वारहाटच्या आसपास च्या खेड्यांमध्ये व बाबाजींच्या गुहेच्या जवळच्या भागात वाय एस एस अनेक कोविड उपचार केंद्रे उभारू शकले. ह्या सेवेचा खेडुतांनी आभारपूर्वक स्वीकार केला व स्थानीय अधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कारण इतर कोणतीही संस्था त्यांच्या तुटपुंज्या प्रयत्नांद्वारे दूरच्या एकाकी भागांमध्ये मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते.

वाय एस एस ने द्वारहाट शासकीय रुग्णालयाला ऍम्ब्युलन्स देणगी रूपात दिली

द्वारहाट शासकीय रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनंती वरून वाय एस एस ने अत्यंत गरजेची, नवी, पूर्णपणे सुसज्ज ऍम्ब्युलन्स देणगी रूपात दिली. द्वारहाट कडून कोविडच्या उच्चस्तरीय उपचारासाठी अल्मोरा व हल्दवानी येथे रुग्णांना हलवण्यासाठी ती अतिशय मोलाची ठरली. वाय एस एस च्या उदात्त कार्यासाठी अल्मोरा येथील जिल्हा न्यायाधीशांनी विशेष पत्र पाठवून आभार व्यक्त केले. द्वारहाट येथील रहिवाशांनी ऍम्ब्युलन्सच्या आगमनासाठी कृतद्न्यता व्यक्त केली आणि ती बातमी सर्व स्थानीय वृत्तपत्रांतून व माध्यमांतून जाहीर करण्यात आली.

प्रमुख वैद्यकीय अधिकारी, द्वारहाट यांना नव्या ऍम्ब्युलन्सच्या किल्ल्या सोपवताना भक्त

संपूर्ण जगातून मदतीच्या प्रस्तावांचा वर्षाव

प्रेस व मीडियाद्वारे भारतातील गंभीर परिस्थितीची बातमी पसरल्यावर गुरुजींच्या संपूर्ण जगभरातील वाय. एस एस /एस आर एफ भक्तांकडून वाय एस एस ला फोन येऊ लागले. सहानुभूतीपूर्वक प्रार्थनांचा आधार व वित्तीय हातभार यांचा त्या देणग्यांमध्ये समावेश होता. इतक्या भक्तांच्या प्रेमाचा वर्षाव आम्हाला तीव्रतेने स्पर्शून गेला, आणि महान गुरुजन त्यांचे प्रेम व आशीर्वाद भारताला ह्या दयाळू आत्म्यानमार्फत पाठवीत आहेत, याची जाणीव झाली. आम्ही त्या प्रत्येकाचे अत्यंत ऋणी आहोत.

द्वारहाट जवळ मदत कार्याचे समन्वयन करणाऱ्या भक्तांपैकी एकाचे उद्गार

“द्वारहाट व आसपासच्या खेड्ययांमध्ये जेथे कुणीही येण्याची तयारी दाखवली नाही तेथे स्वयंसेवकांची व भक्त डॉक्टरची निष्ठापूर्वक सेवा खरोखरीच प्रेरणादायक आहे. सल्ला व औषधे देऊन आणि साथीचा प्रसार थांबवण्यासाठी घेण्याच्या आवश्यक सावधगिरीबद्दल खेडूतांना प्रशिक्षित करून आपल्या गटाने अनेक जिवने वाचवली आहेत. ’’ टी. एम. द्वारहाट

दूरच्या कन्नूर जिल्हा केरळ मधील जमातीच्या पुनर्वसनाच्या कार्यात मदत करणाऱ्या एका सरकारी कर्मचारी भक्ताचे उद्गार –

“ ह्या भागात सार्वजनिक वाहतुकीची सोया नाही आणि रहिवाश्यांचे उत्पन्न शेतीद्वारे थोडेसे आहे.
साथीच्या आघातानंतर कोविड ग्रस्त झालेल्याना, त्यांची सुश्रुषा करणार्यांना आवश्यक असा अन्नपुरवठा किंवा मास्क, ग्लोवज् इ. पुरेसा वैद्यकीय पुरवठा उपलब्ध नव्हता. वाय एस एस च्या तत्पर मदतीमुळे आम्ही रेशन धान्य कुटुंबांना पुरवू शकलो. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि संरक्षणासाठी पुरेशी आरोग्य रक्षणाची व वैद्यकीय सामुग्री पुरवू शकलो. या उदात्त कार्याचा एक भाग असल्यामुळे माझे हृदय हर्षाने भरभरून आले आहे.” – जे. टी.वी. कन्नूर.

आम्ही आर्थिक साहाय्य पुरवलेल्यांच्या जवळच्या नातलगांकडून आणि अनेक एन. जी. ओ. आणि रुग्णालयांतून ज्यांना आम्ही जीवनरक्षक वैद्यकीय साधने आणि औषधे पुरवली त्यांच्याकडून आम्हाला अनेक हृदयस्पर्शी पोचपावती व फोन आले. देशातील अनेक इलेक्ट्रॉनिक आणि छापील माध्यमांनी संस्थानाने केलेल्या धर्मार्थ कार्याबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे.

मदत कार्यात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या व समन्वयन करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांप्रती आम्ही अत्यंत कृतज्ञ व अंतःकरणपूर्वक आभारी आहोत. ज्यांनी उदारहस्ते ह्या महान मानव हितकारी कार्यासाठी हातभार लावला, त्यांच्या सत्कार्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. सर्वाधिक महत्वाचे आमच्या ज्या दैनंदिन स्वास्थ्यकारी प्रार्थना सत्रात आणि जागतिक प्रार्थनासभेत सहभाग घेतलेल्यांचे आणि सहभागी होत राहणाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत व मनःपूर्वक आभारी आहोत. गरजवंतांसाठी सामूहिक प्रार्थना करणे आणि त्यांच्यासाठी स्वास्थ्यकारक स्पंदने व प्रेरणेचे आणि शक्तीचे प्रेमळ विचार पाठवणे आपण सुरूच ठेऊया.

आपले गुरुदेव परमहंस योगानंद म्हणत, “ मी आत्म्याने कार्यरत असतो. कुठलाही पैशाचा विचार न करता केवळ मानवजातीची सेवा हाच विचार घेऊन आणि त्यामुळेच देवाने माझ्या व सेल्फ रियलायझेशन फेलोशिपच्या [योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया] अस्तित्वाला आधार देण्याचे सर्व मार्ग खुले केले आहेत. जसे आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या बांधवांची सेवा करीत आहे. प्रत्येक मार्गाने – भौतिक अथवा आध्यात्मिक – देव आणि आपले गुरु तुमचे मार्गदर्शन करतील. तुम्हाला प्रेरणा देतील आणि त्यांचे प्रेम तुमच्यामधून प्रवाहित होऊन गरजूंपर्यंत पोहोचेल.

तुम्ही देवाच्या सान्निध्याच्या कवेत राहो आणि त्याचे प्रेम व चांगुलपणा इतरांपर्यंत प्रवाहित करो.

दैवी मैत्रीत,

योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया

Share this on

Facebook
X
WhatsApp