गुरूदेवांच्या भारतातील भक्तांसाठी प्रार्थनांद्वारे उत्तेजना आणि विश्वास देणारा संदेश स्वामी चिदानंद गिरीजी यांजकडून

24 एप्रिल, 2021

प्रिय आत्मन,

आपल्या प्रिय भारतात कोव्हीड साथीचा रोग तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना भेडसावतो आहे हे पाहून, मला वाटते तुम्हाला माहीत असावे की, मी तुम्हाला माझ्या सखोल प्रार्थनेमध्ये समाविष्ट केले आहे. मी असे मानसचित्रण करीत आहे की, परमेश्वराचा भव्यदिव्य प्रकाश आणि आशिर्वाद तुमच्या सभोवताली आहे आणि तुमचे रक्षण करीत आहे आणि आपल्या वैश्विक कुटुंबाला क्लेशकारक असा हा विनाश शीघ्रतेने थांबवितो आहे.

साथीच्या रोगामुळे तुमच्या जीवनात आणि समाजात भयंकर अडचणी निर्माण झालेल्या पाहून मला तुम्हा सर्वांबद्दल अत्यंत सहानुभूती वाटते आहे. अशा कसोट्या जगावर ईश्वराने लादलेल्या नसून, त्या मानवजातीच्या स्वनिर्मित अदृश्य सामूहिक संचित कर्मांच्या परिणामस्वरूप असतात. आणि तरीही आपण ईश्वराची प्रिय बालके असल्यामुळे, जर आपण त्याच्याशी अनुसंधान राखले, आणि कोणत्याही कठीण प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागले तरीही, आपल्याला त्याचे अदृश्य हात आणि त्याचा प्रेमळ सहवास आपल्या सोबत असलेला नेहमीच जाणवू शकतो. मी विनंती करतो की तुम्ही ह्या सत्याशी दृढपणे संलग्न रहा. आंतरिक शांतता आणि ईश्वराच्या प्रेमावरील आणि शक्तीवरील विश्वास राखल्याने आपण ह्या अत्यंत कठीण परीस्थितीतून पार पडू, कारण तोच आपली महान स्वर्गीय सुरक्षा आहे – आपल्याला संकटातून पार नेऊन अंतिम सुरक्षा देणारा आणि रोगनिवारक, चिरंतन मार्गदर्शक.

जेव्हा तुमची बाह्य स्थिरता व स्वास्थ्य ढळवून टाकणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीशी सामना करीत असता, मी तुम्हाला प्रोत्साहित करतो की तुम्ही कोणतीही भीती आणि असुरक्षिततेला सामोरे जाताना जाणिवपूर्वक हे लक्षात घ्या की, आपल्या सर्वांचे सर्वशक्तीमान परमपिता/ जगन्माता तुमच्याबरोबर इथे आणि आत्ता आहेत. त्याचवेळेस गुरुजींच्या शब्दांत पुनःपुन्हा सर्व शक्तिनिशी अनुमोदन करा: “मी ईश्वरी उपस्थितीच्या किल्ल्यात आहे. कोणतीही हानी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीत – शारीरिक, मानसिक, आर्थिक, अध्यात्मिक – मी ईश्वराच्या उपस्थितीच्या गढीत सुरक्षित आहे.”

ध्यान ही आपली सर्वात मोठी सुरक्षितता आहे, आणि संकटकाळी हार न पत्करता आणि काही धक्का न लागता आपल्या आत्म्यासह त्यातून पार पडण्याचे सर्वात मोठे आश्वासन आहे.

जर आपण आपले अंत:करण ईश्वरासमोर मोकळे करतो- अगदी क्षणभर, जितक्यावेळा शक्य होईल तितक्यावेळा – तर त्याचे आरोग्यदायी प्रेम आणि स्थैर्य देणारे ज्ञान, आपल्या आंतरिक शक्तीचे नूतनीकरण करून आणि आपली जाणीव सगळ्या संशयांच्या आणि अनिश्चिततेच्या पलीकडे नेऊन आपल्याला सांत्वना आणि आधार देईल. अशा तऱ्हेने समोर असलेल्या परिस्थितीत आपण स्वतःला धैर्याने आणि अंतर्ज्ञानाच्या दिशानिर्देशाने परिपूर्ण करून, जे काही योग्य ते करण्यास उद्युक्त होऊ.

गुरुदेव आपल्याला योग्य दृष्टिकोन देतात ज्याने आपल्याला कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत प्रतिकूलतेचा सामना करता येईल: “आपले विचार व वागणूक सकारात्मक, विधायक ठेऊन ‘विरोधाचा सराव’ करा. तितिक्षेचा सराव करावा, ज्याचा अर्थ अप्रिय अनुभवांना बळी न पडता, पण त्यांचा मानसिकरित्या अस्वस्थ न होता प्रतिकार करणे. जेव्हा आजार येईल, तेव्हा तुमचे मन अस्वस्थ न होऊ देता जगण्याचे आरोग्यविषयक नियम पाळा. तुम्ही कराल त्या प्रत्येक गोष्टीत क्षुब्ध न होता शांत रहा”.

प्रिय आत्मन, विश्वास असू द्या की, गुरुदेवांच्या सगळ्या वाय.एस.एस./ एस.आर.एफ. आश्रमांतील संन्यासी आणि संन्यासिनी भारतातील तुमच्यापैकी प्रत्येकासाठी आणि जगासाठी आरोग्यदायी प्रकाश आणि धीर देणारे प्रेमळ विचार प्रक्षेपित करीत, माझ्याबरोबर गहन प्रार्थना करीत आहेत. ज्या कोणाला ईश्वराच्या कृपेची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे, त्या सगळ्यांसाठी, कृपया आमच्याबरोबर आरोग्यदायी स्पंदने पाठविण्यामध्ये तुमच्या प्रार्थनांचा सहभाग असू दे. एकमेकांना साहाय्य करून, आपल्या शांत उदाहरणाने आपल्या सभोवताली असणाऱ्यांची उन्नती करून, आणि आपल्या स्वतःला शक्तीच्या आणि धैर्याच्या अनंत स्त्रोताने संचारित करून आपण ह्या कठीण वेळी एकत्रितपणे विजय मिळवून आपला मार्ग काढू.

ईश्वर आणि गुरू तुम्हांस आशिर्वाद देवो, मार्गदर्शन करो, तुमचे व तुमच्या

कुटुंबाचे रक्षण करो,
स्वामी चिदानंद गिरीजी

Share this on